- आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. १३ मे २०२६) :- पुण्यातील आयटी हब समजल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेत, हिंजवडी फेज ३ येथील एका रहिवाशाची तब्बल २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या क्रेडिट कार्डचा वापर करून ‘बुक माय शो’ची महागडी गिफ्ट कार्ड्स खरेदी केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद येवले (रा. ईवॉन होम्स, मेगापॉलीस सर्कल, हिंजवडी फेज ३) हे ३ मे रोजी दुपारी आपल्या घरात असताना ही घटना घडली. अवघ्या दोन मिनिटांच्या कालावधीत (दुपारी ४:०५ ते ४:०७ दरम्यान) त्यांच्या आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या क्रेडिट कार्डवरून दोन मोठे व्यवहार झाले.
अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या बँक खात्याची किंवा क्रेडिट कार्डची माहिती मिळवून ‘बीग ट्रि इंट्रा’ (Big Tree Intra) या प्लॅटफॉर्मवरून ‘बुक माय शो’ची (BookMyShow) दोन महागडी गिफ्ट कार्ड्स ऑर्डर केली.
या दोन व्यवहारांद्वारे एकूण २,००,००० रुपयांचा अपहार करण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली.
:
याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १२ मे रोजी सायंकाळी हा गुन्हा रितसर नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत













