न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारत आणि डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पांची अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी पाहणी करून पावसाळ्यापूर्वी सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच दोन्ही प्रकल्पांचा प्रगती अहवाल दर १५ दिवसांनी सादर करण्यास सांगितले.
पाहणीदरम्यान मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, कार्यकारी अभियंते विजय भोजने आणि संध्या वाघ उपस्थित होते.
कुलदीप जंगम यांनी प्रकल्प परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण, पाणी निचरा व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. नवीन प्रशासकीय इमारतीमुळे महापालिकेची विविध कार्यालये एकाच छताखाली येणार असून नागरिकांना आधुनिक सेवा मिळणार आहेत. तर डेअरी फार्म उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर पिंपरी, पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील वाहतूक कोंडीत मोठी घट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.













