- महापौरांनी वाहनावरील पाटी झाकली..
- काही पदाधिकाऱ्यांना आचारसंहितेची कल्पनाच नाही..
- वाहनांवरील नावाच्या पाट्या तशाच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १८ मे २०२६) :- भारत निवडणूक आयोगाने पुण्यासह महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच पिंपरी-चिंचवड शहरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर महापौरांनी आपल्या वाहनावरील नावाची पाटी झाकल्याचे दिसून आले. मात्र काही पदाधिकाऱ्यांना आचारसंहितेबाबत पुसटशीही कल्पना नसल्याने त्यांच्या वाहनांवरील नावाच्या पाट्या तशाच असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. त्यामुळे प्रशासनाकडून आचारसंहितेची प्रभावी जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २५ मे २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून २०२६ असून, अर्जांची छाननी २ जून रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.या निवडणुकीसाठी मतदान १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत पार पडणार आहे. त्यानंतर २२ जून २०२६ रोजी मतमोजणी होणार असून, २५ जूनपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने संबंधित प्रशासनाला आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर झाला. आता आचारसंहिता काळात धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत.
-मनोज लोणकर, सहआयुक्त, सामान्य प्रशासन विभाग, मनपा…













