- चार जणांवर गुन्हा दाखल
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२६) :- संत तुकारामनगर भागात म्हाडाचे रो-हाउस स्वस्तात खरेदी करून देतो असे सांगून एका महिलेची ७४ लाख २० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपरीतील संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप मारुती गोपलघरे (रा. कोथरूड), गोकुळ नामदेव माहिते (रा. आंबेगाव खुर्द), निखिल अंबाजी पवार (वय ३५, रा. खराळवाडी, पिंपरी) आणि कुलदीप सिंग मोहिंदर सिंग एधी (वय ५६, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पूनम रामप्रसाद शर्मा (वय ४४, रा. संत तुकारामनगर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२४ ते मे २०२६ दरम्यान आरोपींनी संगनमत करून फिर्यादी पूनम शर्मा व त्यांच्या पतीचा विश्वास संपादन केला. संत तुकारामनगर येथील ययाती गल्ली नंबर १ मधील १४ क्रमांकाचे म्हाडाचे रो-हाउस खरेदी करून देण्याचे आमिष त्यांनी दाखवले. यासाठी आरोपींनी वेळोवेळी फिर्यादींकडून रोख (कॅश) आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण ७४,२०,०००/- रुपये घेतले. मात्र, पैसे घेऊनही रो-हाउस न देता फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडे पुढील तपास करत आहेत.














