- गंभीर जखमी कामगाराचा मृत्यू, चालक अटक
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२६) :- संत तुकारामनगर मेट्रो रेल्वे स्टेशनखाली रस्त्यावरील झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला एका भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात टँकरसोबत काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुण कामगाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. ही घटना २१ मे रोजी सकाळी ७:१० वाजता घडली.
शामसुंदर शेषराम गौतम (वय २२, रा. दापोडी, पुणे) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी टँकर चालक गणेश शंकर जाधव (वय ३६, रा. दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे.
अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालक आरोपी नरेशकुमार सुरेंद्र दास (वय २४, रा. पनवेल, मूळ रा. बिहार) याला अटक केली आहे.
फिर्यादी गणेश जाधव हे संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनच्या पिलर क्र. पी-३३५ जवळ मेट्रो पुलाखालील झाडांना टँकरने पाणी टाकत होते. याच वेळी आरोपी चालक नरेशकुमार याने आपल्या ताब्यातील ट्रक हयगयीने आणि भरधाव वेगाने चालवून टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत टँकरचे मोठे नुकसान झाले, तर तिथे काम करणारा शामसुंदर गौतम हा गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पिंपरी पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार पुढील तपास करत आहेत.














