- डॉ. बाबा कांबळे यांचे आंदोलन मागे..
- संत रोहिदास मंदिराच्या निवारा शेड दुरुस्तीला हिरवा कंदील..
- वारकऱ्यांच्या सुविधांसाठी प्रशासनाचे तात्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. २२ मे २०२६) :- नगराध्यक्ष प्रशांत कुराडे यांच्या मध्यस्थीमुळे श्रीक्षेत्र आळंदी येथे निर्माण झालेला तणाव अखेर निवळला असून, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. संत रोहिदास महाराज पादुका मंदिर परिसरातील निवारा शेड दुरुस्तीचे काम नगरपरिषदेकडून थांबवण्यात आल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता.
समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा संस्थानतर्फे संत गोविंद बाबा समाधी मंदिर व संत रोहिदास महाराज पादुका मंदिर परिसरातील सुमारे १०० वर्षे जुने आणि जीर्ण झालेल्या पत्रा शेडची दुरुस्ती सुरू करण्यात आली होती. आगामी पावसाळा आणि ८ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र काही तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाने हे काम थांबवले होते.
या निर्णयाविरोधात डॉ. बाबा कांबळे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. भाविकांच्या सुविधांमध्ये अडथळा आणणाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. यानंतर नगराध्यक्ष प्रशांतदादा कुराडे आणि भाजप गटनेते सचिनदादा गिलबिले यांनी पुढाकार घेत आंदोलक व प्रशासन यांच्यात मध्यस्थी केली.
बैठकीत प्रशासनाने आवश्यक कायदेशीर परवानगी घेऊन निवारा शेड दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन दिले. वारकऱ्यांना आषाढी वारीदरम्यान कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. नगराध्यक्षांच्या सकारात्मक भूमिकेमुळे संभाव्य संघर्ष टळला आणि आंदोलन मागे घेण्यात आले.
या चर्चेसाठी झालेल्या शिष्टमंडळात संजय खामकर, लक्ष्मण घुमरे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव चव्हाण, विश्वस्त तुषार नेटके, मधुरा डांगे, आशा बाबासाहेब कांबळे, ह.भ.प. संदीपान महाराज घायाळ, मंदिराचे पुजारी नारायण गाडेकर, राहुल कुराडे, महेश जाधव, मंचक यादव, सुनिताताई ठुबे, सचिन आडवळे, मोहन भालेराव, अशोक पांढरे, सुलतान शेख आदींसह अनेक वारकरी व समाजबांधव उपस्थित होते.













