- नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा आरटीओचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ मे २०२६) :- नवीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होत असून, विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पिंपरी-चिंचवड प्रशासनाने शालेय बस आणि स्कूल व्हॅन चालक-मालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. सर्व शालेय वाहनांची आवश्यक कागदपत्रे तातडीने वैध व अद्ययावत करून घ्यावीत, अन्यथा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
आरटीओ प्रशासनाच्या माहितीनुसार, स्कूल परमिट, फिटनेस प्रमाणपत्र, वाहन विमा, पीयूसी, आरसी बुक, कर पावती तसेच चालकाकडे वैध ट्रान्सपोर्ट परवाना आणि बिल्ला असणे अनिवार्य आहे. याशिवाय प्रत्येक शालेय वाहनावर ‘स्कूल बस’ असा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक असून, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी आणि स्पीड गव्हर्नर यंत्रणा कार्यरत स्थितीत असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये महिला अटेंडंट असणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच वाहन चालकांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करण्यात आलेली असावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, शाळा सुरू झाल्यानंतर विशेष ‘फ्लाईंग स्क्वॉड’ पथकांमार्फत स्कूल बस आणि व्हॅनची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान कागदपत्रे अपूर्ण आढळल्यास किंवा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित वाहन चालक व मालकांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर व्हावा यासाठी सर्व शाळा प्रशासन, वाहतूकदार आणि वाहन चालकांनी वेळेत कागदपत्रांचे नूतनीकरण करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांनी केले आहे.














