- ‘शहर अभियंता’ पद तीन महिन्यांपासून रिक्त..
- महापौर रवि लांडगे मौन सोडून हस्तक्षेप करणार का?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार सध्या अक्षरशः ‘रामभरोसे’ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. शहर अभियंता हे महापालिकेतील अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णयक्षम पद तब्बल तीन महिन्यांपासून रिक्त असूनही प्रशासन आणि सत्ताधारी पूर्णपणे शांत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेचे तत्कालीन शहर अभियंता मकरंद निकम यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर हे पद आजतागायत भरले गेलेले नाही. विशेष म्हणजे, शहराच्या विकासकामांचे नियोजन, निविदा प्रक्रिया, अंदाजपत्रके, रस्ते, पूल, बांधकाम परवानग्या, क्रीडा व उद्यान विभाग अशा महत्त्वाच्या कामांचा केंद्रबिंदू असलेले पद रिकामे असतानाही प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही.
तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहर अभियंत्याची नियुक्ती करण्याऐवजी विविध विभागांचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांवर टाकून वेळ मारून नेल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. परिणामी अनेक विभागांतील अधिकारी अतिरिक्त जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबले गेले असून, विकासकामांच्या निर्णय प्रक्रियेवर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, शहर अभियंता हे पद केवळ प्रशासकीय नसून कायदेशीरदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे. निविदा समिती, अंदाज समिती आणि विविध तांत्रिक समित्यांमध्ये शहर अभियंता पदसिद्ध सदस्य असतो. मात्र पद रिक्त असल्याने त्या अधिकारांचे हस्तांतरण महापालिकेतील काही अधिकाऱ्यांसह अतिरिक्त आयुक्तांकडे करण्यात आले आहे. त्यामुळे अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, शहरात रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, बांधकाम परवानग्या आणि स्मार्ट सिटीसारख्या प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना, त्या सर्व कामांवर नियंत्रण ठेवणारे मुख्य पद रिक्त असणे ही गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे प्रशासनाचा कारभार नेमका कोणाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याप्रकरणी शहराचे महापौर रवि लांडगे यांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शहरातील विकासकामांचा दर्जा, पारदर्शकता आणि निर्णय प्रक्रिया यावर परिणाम होत असताना सत्ताधाऱ्यांची भूमिका नेमकी काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
महापालिकेतील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेले शहर अभियंता पद रिक्त असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची ही उदासीनता भविष्यात शहरासाठी धोकादायक ठरू शकते, अशी प्रतिक्रिया महापालिका वर्तुळातून उमटत आहे.














