- निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणातील त्रुटी आढळल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० मे २०२६) :- फुगेवाडी परिसरातील विषारी दारूकांड प्रकरणात गंभीर निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणातील त्रुटी आढळून आल्याने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दापोडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह सहा पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये दापोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे, तपास पथक प्रमुख फौजदार राजू भास्कर, तसेच पोलिस कर्मचारी जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव आणि विशाल काळे यांचा समावेश आहे. यापूर्वीही या प्रकरणात दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह एकूण नऊ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.
फुगेवाडी परिसरात विषारी दारू सेवनामुळे सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची पोलिस आयुक्तालय स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली होती. त्यानंतर संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची अंतर्गत पडताळणी करण्यात आली. या चौकशीत अवैध दारू व्यवसायावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात हलगर्जीपणा झाल्याचे तसेच वरिष्ठ स्तरावर योग्य पर्यवेक्षण न झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणात आणखी काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची भूमिका समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चौकशीचा विस्तार होण्याची शक्यता असून संबंधितांवर आणखी कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विषारी दारूकांडानंतर पोलिस प्रशासनाने अवैध दारू व्यवसायाविरोधात विशेष मोहीम सुरू केली असून शहरासह ग्रामीण भागात धाडसत्र सुरू आहे.















