न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात विषारी मद्यप्राशनामुळे झालेल्या मृत्यूंच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने दापोडी येथे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांची भेट घेऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.
विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी प्रशासन व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप केला. युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांनी पुणे-पिंपरीची अवस्था बिहारसारखी झाल्याची टीका केली. कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहराची बदनामी झाल्याचे म्हटले. सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मयूर जाधव यांनी अवैध दारू अड्डे कायमचे बंद करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला.















