न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ३० मे २०२६) :- संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना तीर्थक्षेत्र येलवाडी ते देहूगाव मार्गावरील अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी मागणी येलवाडीचे सरपंच रणजित गाडे यांनी केली आहे.
येलवाडी-देहूगाव रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणासाठी सुमारे १२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून निविदा व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कामालाही सुरुवात झाली असली तरी अतिक्रमणांमुळे अडथळे निर्माण होत आहेत. अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी पीडब्ल्यूडी आणि पीएमआरडीए यांनी संयुक्तपणे घेतली असून संबंधित प्रकरणात खेड प्रांत अधिकाऱ्यांशीही चर्चा झाली आहे.
ज्या भूमीधारकांना मोबदला मिळालेला नाही त्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यात हजारो वारकरी या मार्गाने प्रवास करणार असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.















