न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० मे २०२६) :- फुगेवाडी आणि हडपसर परिसरातील विषारी गावठी दारूकांडात सुमारे १६ नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित आरोपी तसेच पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर “मोक्का” अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड झोपडपट्टी विभागाचे अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
तसे निवेदन त्यांनी पोलीस आयुक्तालयात दिले. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शहरात हातभट्टी दारू आणि अंमली पदार्थ विक्री वाढल्याने युवकांचे भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप ओव्हाळ यांनी केला. यावेळी अमोल मिसाळ, चंदू हलगी, छोटू खान, दत्ता थोरात आणि गणेश गायकवाड उपस्थित होते.















