न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महापौर रवि लांडगे यांनी NHAI अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत शहरातील वाहतूक, पावसाळी समस्या आणि विकासकामांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी, नाशिक फाटा ते खेड उन्नत मार्ग प्रकल्प, सेवा रस्त्यांचे रुंदीकरण, अंडरपासमधील पाणी साचण्याच्या समस्या आणि अपघातप्रवण ठिकाणांवरील उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या.
महापौर रवि लांडगे यांनी भोसरी येथील विद्यमान उड्डाणपूल कोणत्याही परिस्थितीत पाडू नये तसेच गावठाण परिसरात अतिरिक्त भूसंपादन करू नये, अशी ठाम भूमिका मांडली. विकासकामांच्या नावाखाली नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. वाकड, पुनावळे, ताथवडे, रावेत आणि किवळे परिसरातील वाहतूक आणि जलनिस्सारण समस्यांवरही त्यांनी लक्ष वेधले.
NHAI चे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी महापौरांनी मांडलेल्या सर्व विषयांवर सकारात्मक भूमिका घेत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.















