न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ जुन २०२६) :- NEET-UG 2026 परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस (RCC) यांच्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथील शाखांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, NEET-UG 2026 परीक्षेतील कथित गैरप्रकारांचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून सुरू असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित शैक्षणिक संस्थांचे परवाने रद्द करून त्यांच्या शाखा बंद करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अशा गंभीर प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर परिणाम होत असल्याचे जाधव यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
RCC क्लासेसच्या सर्व शाखांची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच मागील काही वर्षांतील प्रवेश परीक्षा प्रक्रियेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.















