न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १ जुन २०२६) :- भोसरी परिसरात वाहन विक्री करार करूनही कर्जाचे हप्ते न भरता तसेच वाहन स्वतःच्या नावावर हस्तांतरित न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आनंद बलभिम सरवदे (वय ३५, व्यवसाय चालक, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुदस्सिर मोहम्मद इसहाक (वय ४२, रा. मालेगाव, जि. नाशिक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीचे टाटा कंपनीचे एमएच १४ के्यू ४५०३ क्रमांकाचे वाहन आरोपीस १२ फेब्रुवारी २०२४ रोजी करारनामा करून विकले होते. वाहनावरील श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते भरण्याची जबाबदारी आरोपीने स्वीकारली होती. सुरुवातीचे काही हप्ते भरल्यानंतर आरोपीने पुढील हप्ते भरणे बंद केले.
तसेच संबंधित वाहन आरोपीने परस्पर माणिक रघूनाथ पटेल उर्फ पप्पू भाई कन्सेंटवाला यांच्या ताब्यात दिल्याचे समोर आले आहे. फिर्यादी यांनी वाहन आरोपीच्या नावावर हस्तांतरित करण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित वाहनावर अवैध वाहतूक प्रकरणी नाशिक जिल्ह्यातील वन विभागाकडून गुन्हा दाखल झाला असून त्याबाबतची नोटीस फिर्यादीस प्राप्त झाली आहे. त्यामुळे आरोपीने करारातील अटींचे पालन न करता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दशवंत करीत आहेत.















