न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ जुन २०२६) :- पिंपरीतील मोरवाडी ब्रिजखालील ग्रेड सेपरेटर रोडवर कार ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून तिघांनी एका बांधकाम व्यावसायिकास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रदीप विजय नाईक (वय ३६, रा. रावेत, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अर्जुन युवराज पाटील (रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड), कृष्णाथ मोहन कोरडे (रा. कात्रज, पुणे) आणि सागर बिभीषण घोगरे (रा. आर्वी, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० मे २०२६ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे पुणे ते रावेत मार्गे कारने जात असताना मोरवाडी ब्रिजखालील ग्रेड सेपरेटर रोडवर आरोपींनी त्यांच्या वाहनाने ओव्हरटेक केले. यावेळी रस्त्यावर साचलेले पाणी फिर्यादी व त्यांच्या गाडीत असलेल्या नातेवाईकांच्या अंगावर उडाले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादींच्या कारसमोर स्वतःची कार आडवी लावून रस्ता अडवला.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तळपे करीत आहेत.















