- हातभट्टी दारू, गांजा आणि दारू निर्मिती साहित्य जप्त; अनेक आरोपींवर गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ जुन २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी ३० मे रोजी शहरासह मावळ, हिंजवडी, देहूरोड, चिंचवड, बावधन, आळंदी आणि दक्षिण महाळुंगे परिसरात अवैध दारूविक्री, हातभट्टी दारू निर्मिती आणि अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देहूरोड परिसरात पोलिसांनी ७० लिटर हातभट्टी दारूसह एका आरोपीला अटक केली. शिरगाव येथे पोलिसांनी छापा टाकत सुमारे एक हजार लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट केले, मात्र महिला आरोपी पोलिसांना चकवा देत पसार झाली. हिंजवडी येथे गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हिंजवडी फेज-१ परिसरात अंमली पदार्थविरोधी पथकाने १ लाख २६ हजार रुपयांचा गांजा, मोबाईल व दुचाकीसह आरोपीला ताब्यात घेतले.
पिंपरीतील अंबेडकर चौक परिसरात रिक्षामधून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडण्यात आले. बावधन, चिंचवड, आळंदी आणि दक्षिण महाळुंगे परिसरात गावठी दारू विक्री व निर्मितीसाठी साहित्य साठवून ठेवणाऱ्या महिला आरोपींसह इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. काही ठिकाणी आरोपी पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले, तर काहींना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
या सर्व कारवाया गुन्हे शाखा, अंमली पदार्थविरोधी पथक व स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या केल्या असून पुढील तपास संबंधित पोलीस अधिकारी करीत आहेत.















