- कायमस्वरूपी वाहतूक पोलीसाची नेमणूक करा; अन्यथा आंदोलनाच पर्याय…
- नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे यांचा वाहतूक विभागाला इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १ जुन २०२६) :- पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते स्वराज चौक या परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमावेत, अशी मागणी प्रभाग क्रमांक २८ च्या नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे यांनी पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांकडे केली आहे. तसेच निष्पाप नागरिकांच्या जीवाचा अजून किती दिवस खेळ करणार आहात?, असा संतप्त केला आहे. लवकरात लवकर येथे वाहतूक पोलिसंची नेमणूक न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे वाहतूक विभागाला दिला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे कि, पिंपळे सौदागर, कोकणे चौक, पीके चौक आणि स्वराज चौक हा परिसर सध्या मोठ्या प्रमाणात विकसित झाला असून येथे निवासी संकुले, व्यावसायिक इमारती, शाळा, महाविद्यालये आणि आयटी कार्यालयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यानुसार वाहतूक नियंत्रण व्यवस्था मजबूत करण्यात आलेली नाही. परिणामी या परिसरात सतत अपघात घडत आहेत. त्याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत आहे. या मार्गावर अपघात नित्याचेच झाले आहेत. अनेकवेळा वाहतूक विभाग आणि प्रशासनाकडे लेखी तसेच प्रत्यक्ष पाठपुरावा करूनही काही दिवसांकरिता केवळ दिखावूपणासाठी वाहतूक पोलीस नेमले जातात. त्यानंतर तिथून वाहतूक पोलीस गायब होतात मग पुन्हा सुरु होते ‘येरे माझ्या मागल्या’.
दरम्यान, शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास येथील पीके चौकातील बीआरटी मार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाल्याने दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात दुचाकीस्वार तसेच कार चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नियम डावलून बीआरटीत सर्रास वाहने घुसखोरी करतात. तशात तिथे नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस अथवा वार्डन नसतात. वेगाने धावणारी वाहने आणि कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांचा अभाव यामुळे या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमून चौकांमध्ये कडक वाहतूक नियंत्रण करावे, स्पीड नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात तसेच अपघातप्रवण ठिकाणांचा स्वतंत्र आढावा घ्यावा. अन्यथा स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांसाठी आंदोलन छेडण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे.















