- विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरून पक्षात कुजबुज; स्थानिक नेत्यांमध्ये तीव्र असंतोष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १ जुन २०२६) :- पुणे विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याची चर्चा सुरू झाली आहे. अनेक वर्षे पक्षासाठी झटणाऱ्या स्थानिक नेत्यांना डावलून तुलनेने कमी सक्रिय आणि पक्षात नव्याने आलेल्या नेतृत्वाला संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विक्रम काकडे हे भाजपचे माजी खासदार Sanjay Kakade यांचे पुत्र असून त्यांच्या उमेदवारीमागे पक्षातील गटबाजी आणि दबावाचे राजकारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, खासदार Parth Pawar यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना पक्ष नेतृत्वाचा वरदहस्त मिळाल्याची कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
विधानपरिषद उमेदवारीच्या शर्यतीत पिंपरी-चिंचवडमधून माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल आणि माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांची नावे चर्चेत होती. मात्र, स्थानिक पातळीवर दीर्घकाळ काम करणाऱ्या या नेत्यांना डावलून बाहेरून आलेल्या उमेदवाराला संधी देण्यात आल्याने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
“पक्षासाठी वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्यांना संधी नाही आणि आयात नेत्यांना थेट उमेदवारी दिली जाते,” अशी भावना अनेक पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत असल्याचे समजते. यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















