न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ जुन २०२६) :- मावळ लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्या बारा वर्षांत रेल्वे, रस्ते, मेट्रो, पर्यटन आणि पाणीपुरवठा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे मार्गी लावल्याचा दावा खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. खासदारकीच्या तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी कामांचा लेखाजोखा सादर केला.
बारणे म्हणाले की, १६ वी, १७ वी आणि १८ वी लोकसभेत त्यांनी २०१२ प्रश्न उपस्थित केले असून ५१३ चर्चांमध्ये सहभाग घेतला. तसेच ३६ खासगी सदस्य विधेयके सादर केली असून लोकसभेतील उपस्थिती ९६ टक्के राहिली आहे. उत्कृष्ट संसदीय कामगिरीबद्दल त्यांना पाचवेळा संसद रत्न, एकवेळा संसद महारत्न आणि दोनवेळा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
निगडीपर्यंत मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यात यश आल्याचे सांगत त्यांनी हिंजवडी, वाकड, भोसरी ते चाकण नवीन मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार झाल्याची माहिती दिली. तसेच पनवेल-उरण रेल्वे मार्ग, पुणे-लोणावळा रेल्वे ट्रॅक, अटल सेतू, विविध उड्डाणपूल, पर्यटन विकास आणि पवना धरण गाळ काढण्याच्या कामांचा उल्लेख केला.















