न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ जुन २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि अपुऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर विद्यमान पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे कार्याध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात तायडे यांनी मुख्यमंत्री यांना सविस्तर निवेदन दिले असून, शहरातील गंभीर कायदा व सुव्यवस्था प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक, शैक्षणिक व रोजगाराचे महत्त्वाचे केंद्र असतानाही गेल्या काही महिन्यांत शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विषारी दारू प्रकरण, खून, महिलांवरील अत्याचार, छेडछाड, टोळीगिरी, खंडणी, गोळीबार, वाहनांची तोडफोड, मादक पदार्थांची विक्री तसेच संघटित गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चिंचवड, संत तुकाराम नगर, देहूरोड, पिंपरी, निगडी आणि भोसरी परिसरात खुलेआम बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर खुलेआम सुरू असलेला देहविक्रीचा व्यवसाय, अवैध गुटखा विक्री, मटका, लॉटरी व इतर अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासन प्रभावी नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये असल्याचे तायडे यांनी म्हटले आहे.
तायडे यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीची उच्चस्तरीय चौकशी, विशेष तपास पथकाची नियुक्ती, संवेदनशील भागांमध्ये विशेष मोहीम आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“पिंपरी-चिंचवड शहराची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती उरलेली नाही. त्यामुळे विद्यमान पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करून सक्षम व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी,” अशी मागणी इंजि. देवेंद्र तायडे यांनी केली.















