न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ जुन २०२६) :- आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील नाले सफाई मोहिमेला वेग दिला असून, आतापर्यंत तब्बल ९२.३३ टक्के काम पूर्ण झाले आहे. शहरात पाणी तुंबणे व स्थानिक पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने यंदा नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबविली आहे.
महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मार्चपासून नाले सफाईची कामे सुरू करण्यात आली होती. शहरातील १४१ नाले आणि सुमारे ९४ हजार ९१३ मीटर लांबीच्या नाल्यांची साफसफाई हाती घेण्यात आली आहे. २५ मेपर्यंत ८५.८४ टक्के काम पूर्ण झाले होते, तर १ जूनअखेर ही प्रगती ९२.३३ टक्क्यांवर पोहोचली आहे.
‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाने १०० टक्के काम पूर्ण करत आघाडी घेतली असून, ‘फ’ विभागात ९९.६१ टक्के आणि ‘ई’ विभागात ९८.४४ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विभागांतील कामेही अंतिम टप्प्यात आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नाले सफाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. तर उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी गुणवत्तेवर विशेष भर देत गाळ व कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावली जात असल्याचे सांगितले.














