न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. १ जुन २०२६) :- चाकण महाळुंगे औद्योगिक परिसरातील सावरदरी येथील एका नव्याने सुरू झालेल्या बिअर कंपनीतून तब्बल ३६ लाख रुपये किमतीचे १० बिअर स्टोरेज टँक चोरीस गेल्याप्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी सहा आरोपींना अटक करत गुन्हा उघडकीस आणला आहे. ही चोरी २० फेब्रुवारी ते ३० मार्च २०२६ या कालावधीत घडली होती. याप्रकरणी कंपनीचे प्रतिनिधी विवेक खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील ३० ते ३५ कंपन्यांचे सुमारे ६०० जीबी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कंपनीतील माजी विश्वासू कामगार प्रसाद राजळे याच्यावर संशय बळावला. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर इतर आरोपींनाही अटक करण्यात आली.
पोलिसांनी चोरीस गेलेले १० स्टोरेज टँक कुदळवाडी, चिखली आणि मुंबई-ठाणे परिसरातून जप्त केले. आरोपींमध्ये प्रसाद राजळे, चंदन सिंग, अली चौधरी, फिरोज खान, किसनकुमार गुप्ता आणि नियाज इसराईल यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस उपआयुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.














