- महापौर रवी लांडगेंची घेतली भेट..
- विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला राजकीय अर्थ?
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २ जून २०२६) :- भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किरिट सोमय्या यांनी आज मंगळवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला दिलेल्या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महापौर रवी लांडगे यांची त्यांनी भेट घेतली असून त्याआधी काही वेळ त्यांनी आयुक्तांकडून जन्म-मृत्यू नोंदणी विभागासंदर्भातील विषयांवर आढावा घेतल्याची माहिती समोर येत आहे.
महापालिकेतील जन्म व मृत्यू दाखल्यांच्या नोंदी, पडताळणी प्रक्रिया, तसेच बनावट दाखल्यांबाबत राज्यभर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी आयुक्तांकडून माहिती घेतल्याचे सांगितले जात असले तरी या भेटीमागे केवळ प्रशासकीय कारण नसून राजकीय संकेतही दडले असल्याची चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे सध्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून कालच पुणे विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे सोमय्या हे पक्षश्रेष्ठींचे काही विशेष संदेश किंवा आदेश घेऊन आले होते का, याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तासमीकरणे, आगामी राजकीय घडामोडी आणि विधानपरिषद निवडणुकीतील रणनीती या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय नजरेने पाहिले जात आहे. भाजपच्या स्थानिक पातळीवरील संघटनात्मक हालचाली आणि निवडणुकीपूर्वीची अंतर्गत तयारी याचाही या भेटीशी संबंध जोडला जात आहे.
दरम्यान, या भेटीनंतर अधिकृतरीत्या कोणतेही निवेदन देण्यात आले नसले तरी राजकीय चर्चांना मात्र चांगलेच उधाण आले आहे.














