न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत आकारण्यात येणाऱ्या सेवा कराच्या वसुलीस झोपडपट्टीवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत झोपडपट्टीधारकांनी एकूण १३ लाख ८१ हजार ८६९ रुपयांचा सेवा कर भरला आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने ७ लाख ४६ हजार ४३५ रुपये तर ऑनलाइन माध्यमातून ६ लाख ३५ हजार ४३४ रुपये जमा झाले आहेत. विशेष म्हणजे, एकूण कर संकलनापैकी जवळपास ५० टक्के नागरिकांनी डिजिटल पद्धतीने कर भरून ऑनलाइन सेवांवर विश्वास दाखवला आहे.
महापालिकेकडून झोपडपट्टी परिसरात महिला बचत गटांच्या माध्यमातून सेवा कराची बिले घरपोच वितरित करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत जनजागृतीही केली जात आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांमध्ये नागरी जबाबदारीची भावना वाढत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सेवा कर संकलनात वाढ झाली असून नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद कायम असल्याचे प्रशासनाने सांगितले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी झोपडपट्टीधारक नागरिक शहराच्या विकास प्रक्रियेत जबाबदारीने सहभागी होत असल्याचे सांगितले. तर अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी डिजिटल करप्रणालीमुळे कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक झाल्याचे नमूद केले.















