न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २ मे २०२६) :- ‘जनगणना २०२७’ संदर्भात सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने केले आहे. जनगणनेची प्रक्रिया पूर्णतः अधिकृत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने राबविली जात असल्याचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने नियुक्त केलेले अधिकृत प्रगणक आणि पर्यवेक्षक ‘एचएलओ ॲप’द्वारे ऑनलाइन माहिती नोंदवत असून कोणत्याही कागदी फॉर्मचा वापर केला जात नसल्याची माहिती शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी दिली.
१६ मेपासून सुरू झालेली घरसूचीकरण व घरगणना प्रक्रिया १४ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी खोट्या संकेतस्थळांपासून सावध राहून कोणतीही वैयक्तिक किंवा बँक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.















