- मृतांच्या वारसांना ५ लाखांची शासकीय मदत तातडीने देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २ मे २०२६) :- फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेली ५ लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने मिळावी, यासाठी आमदार अमित गोरखे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा केला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही त्वरीत पूर्ण करण्याची मागणी केली.
या दुर्घटनेनंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन शासनाच्या वतीने आर्थिक मदतीची घोषणा केली होती. मात्र, घटनेला काही काळ उलटूनही संबंधित कुटुंबांना मदत मिळालेली नसल्याने आमदार गोरखे यांनी हा मुद्दा प्रशासनासमोर उपस्थित केला.
घरातील कमावती व्यक्ती गमावल्यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून त्यांना तातडीच्या मदतीची गरज असल्याचे गोरखे यांनी सांगितले. मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्येक मृताच्या वारसाला ५ लाख रुपयांची मदत तात्काळ मंजूर करून ती थेट बँक खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार अमित गोरखे यांच्या या पाठपुराव्यामुळे फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना लवकरच शासनाकडून दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















