- हस्तलिखित श्रीमद्भगवद्गीतेचे प्रकाशन संपन्न..
- धार्मिक कार्यक्रमांत एसपीओंचे योगदान कौतुकास्पद – जगदीश गौरांग प्रभू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २ मे २०२६) :- काव्यमित्र संस्था आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने आयोजित विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) सन्मान सोहळा तसेच उद्योजक अशोक साळुंखे यांच्या हस्तलिखित श्रीमद्भगवद्गीता प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इस्कॉन श्रीकृष्ण मंदिर रावेतचे प्रमुख श्री जगदीश गौरांग प्रभू होते.
यावेळी बोलताना जगदीश गौरांग प्रभू म्हणाले, “निष्काम सेवाव्रत स्वीकारून गेल्या वर्षभरात धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवकांनी पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. गर्दी नियंत्रण, वाहतूक नियोजन आणि बंदोबस्त यांसारख्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. त्यामुळे सर्व उत्सव सुरक्षित वातावरणात पार पडले.”
कार्यक्रमाला गोपाल आचार्य प्रभू, जगन्नाथ गोविंद प्रभू, उद्योजक अशोक साळुंखे, काव्यमित्र संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर, रावेत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख, शिक्षणतज्ज्ञ पंढरीनाथ कांबळे आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात अशोक कृष्णाई श्रीरंग साळुंखे यांच्या हस्तलिखित श्रीमद्भगवद्गीतेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अशोक साळुंखे म्हणाले, “गीता लिहिण्याची प्रेरणा इस्कॉन मंदिरातून मिळाली. २०२४ मध्ये हे कार्य पूर्ण झाले. गीताई हे जीवनाचे सार असून प्रत्येकाने गीतेचे १८ अध्याय वाचणे आवश्यक आहे.”
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या वतीने विशेष पोलीस अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. यामध्ये विशाल शेवाळे, राम सुर्वे, रुपाली भालेराव, उर्मिला देशमुख, चित्रा कोढावदे, प्रियंका जगताप, कांता सोनवणे, जयश्री मनकर, अचला जगदाळे, विद्या परमार, वर्षा भोसले, अनुराधा वाघचौरे, रेखा सोनवणे, गायत्री घरत, संदीप सकपाळ, मंगेश घाग, दत्तात्रय चव्हाण, तेजस सकट, रवींद्र जांभळे, संजय सकपाळ, मंगेश सकपाळ, राहुल चौधरी, सुरेश बोबडे, बाबुराव खोटे, ऋषिकेश चौधर, अभिजीत जोशी, सुनील घोडेकर, नारायण कचर, मंगेश पुरी, अभिषेक हांडे, अनिल मोरे, संजय गोरखा, चंद्रशेखर पुजारी, उमेश देशमुख, अर्पिता भगत, नारायण कचरे, अजित भगत, सुरेश चव्हाण, संजय सकपाळ, राजेंद्र कुवर आणि दत्तात्रय चव्हाण यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सगर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. विजयकुमार पाटील यांनी मानले.














