न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खेड | दि. ३ जून २०२६ :- खेड तालुक्यातील मरकळ गावात जुन्या वादातून तरुणावर कोयता व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी आळंदी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ जून रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कमळजाई वस्ती, मरकळ येथे ही घटना घडली. फिर्यादी ज्ञानेश्वर महादेव पाचपुते (वय २२, व्यवसाय शेती) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
आरोपी बजरंग टाकळकर, निखिल टाकळकर, विलास टाकळकर, प्रज्वल टाकळकर, अभिषेक लोखंडे आणि पंकज साळुंखे यांनी जुन्या वादाच्या कारणावरून फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना “बी.टी. कंपनीच्या नादी लागू नका” अशी धमकी देत पूर्वनियोजित कट रचल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी ज्ञानेश्वर पाचपुते, त्यांचा मित्र देवा फंदे आणि भाऊ सोन्या पाचपुते यांच्यावर कोयता व लोखंडी रॉडसारख्या घातक हत्यारांनी हल्ला केला.
या प्रकरणी प्रज्वल ज्ञानेश्वर टाकळकर याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.















