न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. ३ जून २०२६ :- पिंपळे सौदागर येथील पी. के. चौक परिसरात भरधाव वेगातील दुचाकी बीआरटी बसस्टॉपच्या भिंतीवर आदळल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत प्रभाकरराव गुंजकर हा त्याचा मित्र लोकेश साळापुरीकर याच्यासोबत बजाज कंपनीची पल्सर ही दुचाकी घेऊन नाशिक फाटा ते कोकणे चौक मार्गावर जात होता. दरम्यान, पी. के. चौकाजवळील विश्वशांती कॉलनी परिसरातील बीआरटी बसस्टॉपजवळ त्याने दुचाकी भरधाव वेगात आणि बेदरकारपणे चालवली.
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने दुचाकी थेट बसस्टॉपच्या भिंतीवर आदळली. या भीषण अपघातात संकेत गुंजकर गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जावळे करीत आहेत.















