- विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची महापालिकेकडे तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. ३ जून २०२६ :- दिघी येथील रेड क्लिफ स्कूल प्रशासनाकडून NCERT पुस्तकांना नकार देत पालकांवर महागड्या खासगी प्रकाशनांच्या पुस्तकांची सक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार दाखल करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिक्षण संचालकांनी NCERT पुस्तके वापरण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले असतानाही शाळेकडून दिनांक २२ मे २०२६ रोजी खासगी प्रकाशनांच्या पुस्तकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. अनेक पालकांनी दोन महिन्यांपूर्वीच NCERT पुस्तके खरेदी केली असताना आता नव्याने महागडी पुस्तके घेण्याची सक्ती होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
NCERT पुस्तकांचा खर्च सुमारे ८०० ते १००० रुपये असताना खासगी प्रकाशनांच्या पुस्तकांसाठी ६५०० ते ७५०० रुपये, तर संपूर्ण किटसाठी जवळपास १२ हजार रुपये खर्च येत असल्याने सर्वसामान्य पालकांवर आर्थिक ताण वाढला आहे.
तसेच शाळेकडून मागील अनेक वर्षांपासून पालक-शिक्षक संघाला विश्वासात न घेता फीवाढ केली जात असल्याची तक्रारही पालकांनी केली आहे. मागील चार वर्षांच्या फीवाढीचे प्रकरण शासनाकडे प्रलंबित असतानाही पुन्हा फीवाढ करण्यात आल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
भाऊसाहेब भोईर यांनी महापालिकेकडे शाळेला NCERT पुस्तके वापरण्याचे कठोर आदेश देणे, खासगी पुस्तकांची सक्ती थांबविणे, फीवाढ प्रकरणाचा तातडीने निकाल लावणे आणि पालकांना लेखी स्वरूपात निर्णय कळविण्याची मागणी केली आहे.















