न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. ३ जून २०२६ :- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर कारवाई करत १ लाख ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई खराबवाडी, चाकण-महाळुंगे रोड परिसरात करण्यात आली.
पोलिसांना ‘जय गणेश भारत गॅस’ या दुकानात घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून आरोपी सचिन प्रकाश म्हस्करे (वय ३१) याला ताब्यात घेतले. आरोपी एका विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने घरगुती सिलेंडरमधून इतर सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले.
या कारवाईत ८१ गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी आरोपीविरुद्ध उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा आणि स्फोटक पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.














