- दिव्यांग भवनला भेट देत लाभार्थी व कर्मचाऱ्यांशी साधला संवाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी महापालिकेच्या दिव्यांग भवनला भेट देऊन तेथील विविध सुविधा, सेवा आणि उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी लाभार्थी, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली.
दिव्यांग नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि स्वावलंबी बनविणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत शितोळे यांनी दिव्यांग भवनातील आधुनिक सुविधा, प्रशिक्षण व रोजगाराभिमुख उपक्रमांचे कौतुक केले. भविष्यातही दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी महापालिका कटिबद्ध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
भेटीदरम्यान त्यांनी ई-लायब्ररी, ऑडिओमेट्री रूम, एक्स्पिरियन्स सेंटर, स्पीच थेरपी विभाग, संगणक कक्ष, संगीत विभाग तसेच रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रमांची पाहणी केली. सुमारे २४ हजार चौरस फूट क्षेत्रात उभारलेल्या चार मजली दिव्यांग भवनात विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी भवनाच्या कार्याची माहिती दिली. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याबद्दल शितोळे यांनी समाधान व्यक्त केले.















