- व्हिडिओ कॉलवरील ‘खाकी’ ठरली तोतया…
- ‘मनी लॉन्डरिंग’ प्रकरणात नाव आल्याचे सांगत नागरिकाला ओढले जाळ्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ जून २०२६) :- भोसरी परिसरातील एका व्यक्तीला सीबीआय व पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अटक करण्याची भीती दाखवत सायबर भामट्यांनी तब्बल ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नाळे करीत आहेत.
अशी घडली हकिकत…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मे ते ३ जून २०२६ या कालावधीत आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधून व्हिडिओ कॉलद्वारे स्वतःला टेलिकॉम अधिकारी, सीबीआय अधिकारी तसेच दिल्ली पोलिसांचे अधिकारी असल्याचे सांगितले. फिर्यादींचे आधारकार्ड मनी लॉन्डरिंग आणि अमली पदार्थांच्या गुन्ह्यात वापरले गेले असून त्यांना अटक होऊ शकते, अशी भीती आरोपींनी दाखवली.
तसेच, घराबाहेर जाऊ नये आणि कोणालाही याबाबत माहिती देऊ नये, अशा सूचना देत आरोपींनी आरबीआयच्या नावाचे बनावट पत्र व्हॉट्सॲपवर पाठवले. पोलीस गणवेशातील व्हिडिओ कॉलद्वारे विश्वास संपादन करून फिर्यादींच्या बँक खात्यातील रक्कम ‘व्हेरिफिकेशन’साठी तात्पुरती जमा करण्यास सांगितले.
मग कळले ही तर फसवणूक…
आरोपींच्या सांगण्यावरून फिर्यादींनी आयसीआयसी बँकेच्या खात्यावर ३९ लाख रुपये आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर १६ लाख रुपये अशा एकूण ५५ लाख रुपयांची रक्कम जमा केली. मात्र, त्यानंतर रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.















