न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ जून २०२६) :- औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडचा चेहरामोहरा बदलत असताना शहराला ‘ग्रीन आणि सस्टेनेबल सिटी’ बनविण्याचे उद्दिष्ट असून विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असे आवाहन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित “हरित पिंपरी–चिंचवड शहर अभियान” कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, माजी महापौर माई ढोरे, नगरसेवक नवनाथ जगताप, हर्षल ढोरे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, नगरसेविका पल्लवी जगताप, तृप्ती कांबळे, रवीना आंगोळकर, तसेच दुर्गाकौर आदियाल, महामंत्री मधुकर बच्चे, मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, विविध मंडल अध्यक्ष, बूथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष जतनाची शपथ घेतली.
आमदार जगताप म्हणाले, “झाड लावणे ही केवळ औपचारिकता नसून भविष्यासाठी केलेली सामाजिक गुंतवणूक आहे. प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी आणि घराघरापर्यंत ही मोहीम पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांनी दत्तक घेतलेले एक झाड हीच मोहिमेची खरी यशस्विता ठरेल. स्थानिक जैवविविधतेला पूरक असलेल्या या वृक्षांमुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि निसर्ग यांचा समतोल साधत पिंपरी-चिंचवडला स्मार्ट, हरित आणि शाश्वत शहर बनविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही आमदार शंकर जगताप यांनी यावेळी सांगितले.
या मोहिमेत शोभेच्या वृक्षांऐवजी बकुळ, कडुलिंब, कदंब, ताम्हण, बहावा आणि महोगणी यांसारख्या देशी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली.















