- कोट्यवधींच्या जागेची मुळ कागदपत्रेच गायब?…
- रुग्णालय विस्ताराच्या ‘हरवलेल्या’ भूखंडाला आता कोण वाली?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ६ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाशेजारील कोट्यवधी रुपयांच्या मोक्याच्या जागेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी युनिटसाठी आरक्षित मानली जाणारी ही जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे, याची कागदपत्रेच महापालिकेच्या दप्तरी उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे, वायसीएम रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवांची गरज लक्षात घेऊन याच ठिकाणी सुपरस्पेशालिटी युनिट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मालकी हक्काच्या कागदपत्रांचा मागमूस नसल्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागदावरच अडकून पडला आहे.
सध्या ही बहुमूल्य जागा केवळ वाहनतळ म्हणून वापरली जात असून रुग्णसेवेसाठी तिचा कोणताही उपयोग होत नाही. शहरातील हजारो रुग्णांना हृदयरोग, न्यूरो, कर्करोग, किडनी आणि इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, जर ही जागा महापालिकेची नसेल तर ती नेमकी कोणाची आहे? आणि जर महापालिकेचीच असेल तर तिची मालकी दर्शविणारी कागदपत्रे कुठे गायब झाली? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडे नसल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही जागा वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेची नोंद आणि कागदपत्रे जपण्यात प्रशासन अपयशी ठरले का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जागेची मालकी, कागदपत्रांचा इतिहास आणि सुपरस्पेशालिटी प्रकल्प रखडण्यामागील कारणे नागरिकांसमोर आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील सर्वात मोठ्या महापालिका रुग्णालयाच्या विस्तारासाठी महत्त्वाची ठरणारी जागा नेमकी कोणाच्या ताब्यात आहे, हा प्रश्न आता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.
“वायसीएम रुग्णालयाशेजारील प्रस्तावित जागेच्या मालकीसंदर्भातील मूळ कागदपत्रे महापालिकेच्या अभिलेखांमध्ये उपलब्ध होत नाहीत. संबंधित जागेची मालकी आणि कायदेशीर स्थिती स्पष्ट झाल्यानंतरच पुढील बांधकाम प्रक्रियेला गती देता येईल. मालकी हक्काची पडताळणी पूर्ण होईपर्यंत कोणताही मोठा प्रकल्प हाती घेणे उचित ठरणार नाही. त्यामुळे या प्रकरणाचा सविस्तर शोध घेऊन आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे.”
– कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका…















