- सोमवारपासुन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कामकाज पुर्वरत होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ६ जून २०२६) :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाल्याने संबंधित निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता शुक्रवारी (दि. ५) संपुष्टात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ठप्प झालेले प्रशासकीय व धोरणात्मक कामकाज पुन्हा नियमितपणे सुरू होणार आहे.
आचारसंहितेमुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा तसेच विविध विषय समित्यांच्या सभा रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामी अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित राहिले होते. उपमुख्य निवडणूक अधिकारी विक्रम निकम यांनी आचारसंहिता उठविण्याचे आदेश जारी केले आहेत.
शनिवार-रविवार साप्ताहिक सुटी असल्याने सोमवारपासून (दि. ८) महापालिकेचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होईल. स्थायी समितीची सभा १० जून रोजी तर सर्वसाधारण सभा १५ जून रोजी होणार असल्याची माहिती नगर सचिव उल्हास जगताप यांनी दिली. आचारसंहिता संपल्याने विकासकामे आणि धोरणात्मक निर्णयांना आता गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.















