- नगरसेविका अर्चना तापकीर यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ६ जून २०२६) :- रहाटणी प्रभाग क्रमांक २७ येथील महापालिका शाळेची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आरक्षित जागेवर तात्काळ नवीन व सुसज्ज शाळा इमारत उभारण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका अर्चना विनोद तापकीर यांनी शिक्षण समिती सभापती आणि शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अर्चना तापकीर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहाटणी येथील महापालिका शाळेसाठी जागा आरक्षित असतानाही अनेक वर्षांपासून नवीन शाळा इमारतीचे काम प्रलंबित आहे. परिणामी विद्यार्थ्यांना अपुऱ्या आणि असुरक्षित जागेत शिक्षण घ्यावे लागत असून काही विद्यार्थ्यांना पत्र्याच्या खोल्यांमध्ये बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असताना उपलब्ध जागा अपुरी पडत आहे. यामुळे अध्यापन प्रक्रियेसह विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शैक्षणिक उपक्रमांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः उन्हाळा, पावसाळा आणि इतर प्रतिकूल हवामानाच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने आरक्षित जागेवर आधुनिक सुविधा असलेली नवीन शाळा इमारत उभारणे अत्यावश्यक असल्याचे अर्चना तापकीर यांनी म्हटले आहे.
या गंभीर विषयाची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून शाळा इमारतीच्या बांधकामाची कार्यवाही त्वरित सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रश्नावर महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.















