- खोट्या नफ्याच्या जाळ्यात अडकवून मारला साडेचार कोटींवर डल्ला…
- ‘VIP Strategy Team’च्या जाळ्यात अडकला व्यावसायिक…
- ‘1000 टक्के रिटर्न’च्या मोहात साफ झालं खातं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ६ जून २०२६) :- शेअर ट्रेडिंगमध्ये अवघ्या काही दिवसांत 1000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी पिंपळे सौदागर येथील एका व्यावसायिकाची तब्बल 4 कोटी 43 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला व्हॉट्सॲपवर संपर्क साधत “HSBC Wealth Creation Group” आणि “Internal VIP Strategy Team” या नावांच्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर विविध ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि अॅप्सच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास प्रचंड नफा मिळेल, असे सांगण्यात आले.
सायबर टोळीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला अॅपवर मोठ्या प्रमाणात नफा दिसू लागल्याने फिर्यादीने टप्प्याटप्प्याने कोट्यवधी रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा केले. आरोपींनी अॅपवर तब्बल 26 कोटी 64 लाख रुपयांहून अधिक नफा झाल्याचे दाखवून फिर्यादीला आणखी आकर्षित केले.
मात्र, हा कथित नफा काढण्यासाठी “सर्व्हिस चार्ज”, “टॅक्स” आणि इतर शुल्काच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम मागण्यात आली. संशय आल्यावर फिर्यादीने चौकशी केली असता संपूर्ण व्यवहार फसवणुकीचा असल्याचे समोर आले. तोपर्यंत त्यांची 4.43 कोटी रुपयांची रक्कम सायबर भामट्यांच्या खात्यात गेली होती.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विविध बँक खाती, मोबाईल क्रमांक आणि बनावट ट्रेडिंग वेबसाइट्सच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या आंतरराज्यीय अथवा आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांना आवाहन…
सायबर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील गुंतवणूक योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले असून, अवास्तव परताव्याचे आश्वासन देणाऱ्या कोणत्याही लिंक, अॅप किंवा व्हॉट्सॲप ग्रुपवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले आहे.















