न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ जुलै २०२६) :-काळेवाडीतील पवनानगर परिसरात रात्री मोठ्याने गप्पा मारण्यास विरोध केल्याचा राग मनात धरून चौघांनी दोन जणांवर दगडफेक व मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी सोहेल तवाबअली शेख (वय १८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव इंगवले, रोहन विचारे, बाळा गेंद आणि सूरज घोडके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी गौरव इंगवले, रोहन विचारे आणि सूरज घोडके यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास साहिल जनरल स्टोअर्ससमोरील मोकळ्या जागेत आरोपी मोठ्याने बोलत व गोंधळ घालत होते. यावेळी फिर्यादीचे चुलते मुजिफ मेहंदी हसन शेख यांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने गौरव इंगवले याने मुजिफ शेख यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीलाही जीवे मारण्याची धमकी देत दगडाने मारहाण करण्यात आली. तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.

















