न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ जुलै २०२६) :- पिंपळे सौदागर येथील लोटस ड्रग स्टोअरमध्ये नोकरी करत असताना औषध विक्रीतील रक्कम आणि रोख रकमेचा अपहार केल्याप्रकरणी एका माजी कर्मचाऱ्याविरुद्ध सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सुमारे ७३ लाख २१ हजार ७९४ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी डॉ. शिवदर्शन मोहनलाल अगरवाल (वय ५१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिग्विजयसिंग प्रविणसिंग राजपूत (रा. ताथवडे) याच्याविरुद्ध विश्वासघात व फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सन २०१९ ते जानेवारी २०२६ या कालावधीत लोटस ड्रग स्टोअरमध्ये मासिक वेतनावर कार्यरत होता. या काळात त्याने औषध विक्रीतून मिळालेली ५२.५४ लाख रुपयांहून अधिक रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळवली, तसेच रोख विक्रीतील ३३.६० लाख रुपये स्वतःकडे ठेवल्याचा आरोप आहे. या व्यवहारातून एकूण ७३.२१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सांगवी पोलीस या आर्थिक गैरव्यवहाराचा अधिक तपास करत आहेत.

















