न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ जुलै २०२६) :- सांगवी पोलीस ठाण्यात घडल्याचा दावा करण्यात आलेल्या कथित मारहाण प्रकरणी डीसीपी विवेक पाटील आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टी (आप) युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे ई-मेलद्वारे केली आहे.
काळे यांनी केलेल्या दाव्यानुसार, १२ जुलै रोजी पिंपळे निलख येथील शहीद अशोक कामटे उद्यान चौकात दोन महिलांना मारहाण झाल्यानंतर पीडित आणि त्यांचे नातेवाईक सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, तक्रार नोंदवून घेण्याऐवजी तक्रारदाराच्या मुलासह दोन नातेवाईकांना डीबी रूममध्ये नेऊन डीसीपी विवेक पाटील आणि इतर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून डीसीपी विवेक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी तसेच घटनेच्या वेळी उपस्थित संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून योग्य कारवाई करावी, अन्यथा आम आदमी पार्टी युवा आघाडी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही रविराज काळे यांनी दिला आहे.
दरम्यान याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

















