न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू ( दि. १५ जुलै २०२६) :- देहूगावातील माळीनगर येथे पैशांच्या वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी घनश्याम राजेंद्र कुदळे (वय २०) याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी पहाटे ५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास संभाजी टिळेकर यांच्या रूममध्ये आरोपी आणि त्याचा मोठा भाऊ विनायक राजेंद्र कुदळे यांच्यात उसने घेतलेल्या पैशांच्या कारणावरून वाद झाला. संतापाच्या भरात आरोपीने कांदा कापण्याचा चाकू विनायकच्या छातीच्या डाव्या बाजूला खुपसला. गंभीर जखमी झालेल्या विनायकचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुंदन हिरालाल भगत यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


















