न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड ( दि. १५ जुलै २०२६) :- घरकुल परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नागरिकांनी बुधवारी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला.
मारुती गणपत जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि भाजी मंडई धारक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी प्रशासनाला निवेदन देत एसटीपीचे दूषित पाणी घरकुलात येणे कायमस्वरूपी बंद करणे, बंद असलेली भाजी मंडई सुरू करणे, अपूर्ण सांस्कृतिक भवन व व्यायामशाळा नागरिकांसाठी खुली करणे, अंगणवाडी व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नेमणे, स्टॉर्म वॉटर लाईनची स्वच्छता, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे आणि विशेष विकास कृती आराखडा जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
प्रशासनाने निश्चित कालमर्यादेत निर्णय न घेतल्यास अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. मोर्चादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

















