- प्रत्येक प्रभागात कचरा वर्गीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड ( दि. १५ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रत्येक प्रभागात कचरा वर्गीकरण केंद्र उभारून प्रभागनिहाय जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी महापालिकेच्या सभागृहात केली. कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर राजकारण न करता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
बारणे यांनी शहरात कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करण्यावर भर देत प्रत्येक प्रभागात ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव मांडला. यामुळे खतनिर्मिती, पुनर्वापर आणि कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होईल, असे त्यांनी सांगितले.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना महापालिकेकडून प्रत्येकी १० लाख, संबंधित संस्थांकडून २५ लाख आणि शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत देण्याची माहितीही त्यांनी दिली. जखमींच्या उपचारासाठी महापालिका सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आयुक्त, एनडीआरएफ, लष्कर आणि अग्निशामक दलाच्या बचावकार्याचे त्यांनी कौतुक केले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ३२ प्रभागांमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष कृती आराखडा राबविणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व वृक्षछाटणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

















