- मोशी दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांनामहापालिकेचा आधार..
- दोषींवर कठोर कारवाईच आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड ( दि. १५ जुलै २०२६) :- मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सभेत दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक आधार देण्यासह दुर्घटनेची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेमार्फत रुपये १० लाखांची आर्थिक मदत, तर जखमींना प्रत्येकी रुपये १ लाखांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ठेकेदार मे. अँटोनी लारा यांच्यामार्फत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसाना ५० लाख मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार. तसेच मृतांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च करण्यात येणार असून, मृत व्यक्तींच्या कुटुंबातील पात्र वारसांना महानगरपालिका सेवेत नोकरी मिळण्याच्या दृष्टीने शासनाकडे आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
दुर्घटनेच्या अनुषंगाने मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना सेवेतून निलंबित करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. दुर्घटनेची कारणे, तांत्रिक व प्रशासकीय त्रुटी आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तसेच अँटोनी लारा कंपनीचे प्रकल्प प्रमुख व सुरक्षा निरीक्षक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासोबतच, शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम व विकेंद्रीकृत करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका सभेत यापूर्वी झालेल्या निर्णयानुसार शहरातील सर्व प्रभागांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
“दुर्घटनेत जीव गमावलेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांना केवळ आर्थिक मदत देऊन आमची जबाबदारी संपणार नाही. त्यांच्या मुलांच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारत, पात्र वारसांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. त्याचवेळी या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. निष्पक्ष चौकशीतून जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” अशी भूमिका महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केली.
















