- महापालिका आयुक्त दालनासमोर शिवसेनेचे (उबाठा) ठिय्या आंदोलन, मित्र पक्षाचाही सहभाग…
- दोषी अधिकारी व कंपनीवर कारवाई, मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार, चेतन पवारांचा इशारा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपो दुर्घटनेत जीव गमावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृतांच्या वारसांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरीसह भरीव आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार यांनी बुधवारी (दि. 15) महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार एल्गार पुकारला.
दरम्यान, बुधवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा असल्यामुळे हे आंदोलन लक्षवेधी ठरले. आंदोलकांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोशी दुर्घटनेला प्रशासनच जबाबदार असल्याचा हल्लाबोल करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी चेतन पवार यांनी केली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेणे अपेक्षित असताना, त्यांनी पळ काढला. त्यामुळे शहराला पळपुटा आयुक्त भेटणल्याच्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.
यावेळी चेतन पवार म्हणाले, मोशी कचरा डेपो प्रकल्पाची मुदत संपल्याची माहिती प्रशासनाला पूर्वीपासून होती. याबाबत आयुक्तांसोबत पत्रव्यवहारही झाला होता. तरीही पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली नाही. शहराची वाढ आणि वाढणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न लक्षात घेऊन वेळेत नियोजन करणे अपेक्षित होते. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप कामगारांना जीव गमवावा लागला, असा आरोप त्यांनी केला.
पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपो आरक्षणाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केल्यानंतरही प्रशासनाने पर्यायी उपाययोजना केल्या नाहीत. नागरिकांचे प्रश्न ऐकण्याऐवजी प्रशासनाने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांनी राजकीय भेदभाव न करता सर्व नागरिक व लोकप्रतिनिधींशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, महापौर रवी लांडगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत सर्व मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे चेतन पवार यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. मागण्या पूर्ण नाही झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा चेतन पवार यांनी दिला.
या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, शहर समन्वयक कैलास नेवासकर, शहर कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, भोसरी उपशहरप्रमुख अनिल सोमवंशी, पिंपरी उपशहर संघटक पार्थ गुरव, चिंचवड विभाग संघटक गणेश आहेर, विभाग प्रमुख (पिंपरी) ॲड. सलाम शेख, विभाग प्रमुख (पिंपरी) नितीन चौधरी, उपशहर प्रमुख (भोसरी) प्रशांत मोरे, विभाग प्रमुख (चऱ्होली) श्रीकुमार गंधारे, उपविभाग प्रमुख रवी मोंढवे, उपविभाग प्रमुख शरद जगताप, शिवसैनिक अनिल भोईर, शिवसैनिक विशाल व्यवहारे, प्रवीण शाबूगे, उपजिल्हा संघटक कल्पना शेळे, चिंचवड विधानसभा संघटिका वैशाली वाळके, पिंपरी विधानसभा संघटिका अॅड. वैशाली कुंभार, उपशहर संघटिका (चिंचवड) योगिनी मोहन, विभाग संघटिका नफिसीन शेख आदी आंदोलनात सहभागी होते. तसेच, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने सहभागी झाले.
“पिंपरी-चिंचवड हे शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कचरा डेपोसाठी पर्यायी जागेचा विचार प्रशासनाने खूप आधी करणे अपेक्षित होते. मोशी कचरा डेपो प्रकल्पाची मुदत संपल्याची माहिती असूनही आणि त्याबाबत आयुक्तांशी पत्रव्यवहार झालेला असतानाही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. मग आयुक्त झोपले होते का? ते दोन-तीन गुंठ्यांच्या फाईलिंसाठीच ऑटो क्लस्टर कार्यालयात बसतात का? त्यांना जनतेशी काही घेणंदेणं आहे की नाही? त्यांना केवळ ‘इन्कमिंग सोर्स’ तयार करायचा आहे का? आयुक्तांची नियुक्ती ही सर्वसामान्य नागरिकांची कामे करण्यासाठी झालेली असते. नागरिकांच्या प्रश्नांबाबत जर त्यांना काहीच देणं-घेणं नसेल, तर त्यांनी तात्काळ खुर्ची रिकामी करावी,”
– चेतन पवार, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख, शिवसेना (उबाठा)

















