न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या मृत्यूचे राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी असून, मृत कामगारांची जात-धर्म शोधून समाजात तेढ निर्माण करणारेच खरे जातीवादी आणि संविधानविरोधी आहेत, अशी टीका कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केली. त्यांनी सांगितले की, संघटनेने घटनास्थळी जाऊन प्रसिद्धीसाठी छायाचित्रे काढण्याऐवजी पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
दुर्घटनेप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, कंत्राटी पद्धत बंद करणे, सर्व कचरा प्रकल्पांचे थर्ड पार्टी सेफ्टी ऑडिट, तसेच मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकार, महापालिका आणि संबंधित कंपनीकडून जाहीर आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली. कामगारांना न्याय मिळेपर्यंत कष्टकरी कामगार पंचायत संघर्ष सुरू ठेवेल, असेही डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले.

















