न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ जुलै २०२६) :- मागील आठवड्यातील अतिवृष्टीमुळे चिखली घरकुल परिसरात पाणी साचून नागरिकांचे नुकसान झाल्यानंतर महापौर रवी लांडगे यांनी गुरुवारी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिसराची पाहणी केली. यावेळी जलनिस्सारण, स्थापत्य, पाणीपुरवठा आदी विभागांच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेत पाणी साचण्यामागील तांत्रिक कारणांची तपासणी करण्यात आली.
पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी जलवाहिन्या व नाल्यांची क्षमता वाढविणे, अडथळे दूर करणे आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले. नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी फ प्रभाग अध्यक्षा शिवानी नरळे, नगरसदस्य कुंदन गायकवाड, निलेश नेवाळे, योगिता नागरगोजे, रिटा सानप तसेच अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

















