न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ जुलै २०२६) :- रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरातील वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांची गंभीर दखल घेत आमदार शंकर जगताप यांनी महावितरण आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
इतर विभागांकडून खोदाई करताना भूमिगत वीजवाहिन्यांचे नुकसान होत असल्याने भविष्यात महावितरणशी समन्वय साधल्याशिवाय कोणतीही खोदाईची कामे करू नयेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
तसेच धोकादायक डीपींची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. चिंचवड मतदारसंघात अखंड व सुरक्षित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गहुंजे येथे २२०/२२ केव्ही, ३०० एमव्हीए क्षमतेचे नवीन महापारेषण उपकेंद्र उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. पुढील आठवड्यात महापारेषण व संबंधित विभागांची संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला महावितरणचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


















